संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ| sant dnyaneshwar maharaj haripath

संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ| ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ| ज्ञानेश्वर महाराजांचा संपूर्ण हरिपाठ| ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ| संपूर्ण हरिपाठ| sant dnyaneshwar maharaj haripath| Sampurna haripath| Haripath


।। जय जय रामकृष्णहरि ।।
।। जय जय रामकृष्णहरि ।।
।। जय जय रामकृष्णहरि ।।


रुप पाहतां लोचनीं ।
सुख झाले वो साजणी ।। १ ।।
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ।। धृ ।।
बहुता सकृताची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ।। २ ।।
सर्व सुखाचें आगर ।
बापरखुमादेविवर ।। ३ ।।


।। जय जय रामकृष्णहरि ।।
।। जय जय रामकृष्णहरि ।।
।। जय जय रामकृष्णहरि ।।


सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनिया ।। १ ।।
तुळसीहार गळां कांसे पीतांबर ।
आवडे निरंतर हेंचि ध्यान ।। धृ ।।
मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठी कौस्तुभमणि विराजीत ।। २ ।। 
तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ।। ३ ।।


संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ| ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ| ज्ञानेश्वर महाराजांचा संपूर्ण हरिपाठ| ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ| संपूर्ण हरिपाठ| sant dnyaneshwar maharaj haripath| Sampurna haripath| Haripath


देवाचिये द्वारीं उभा क्षणभरीं । 
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ।। १ ।। 
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । 
पुण्याची गणना कोण करी ।। धृ ।।
असोनि संसारी जिव्हे वेगु करीं ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ।। २ ।। 
ज्ञानदेव म्हणे व्यासाचियें खुणा । 
द्वारकेचा राणा पांडवां घरीं ।। ३ ।।

चहुं वेदीं जाण साही शास्त्रीं कारण । 
अठराही पुराण हरिसी गाती ।। १ ।। 
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । 
वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ।। २ ।। 
एक हरी आत्मा जीवशिवसमा । 
वायां तुं दुर्गमा न घालीं मन ।। ३ ।। 
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । 
भरला घनदाट हरि दिसे ।। ४ ।।

त्रिगुण असार निर्गुण हें सार । 
सारासार विचार हरिपाठ ।। १ ।। 
सगुण निर्गुण गुणाचें अगुण । 
हरिवीण मन व्यर्थ जाय ।। २ ।। 
अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । 
जेथोनि चराचर हरिसी भजे ।। ३ ।।
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
अनंत जन्मोनी पुण्य होय ।। ४ ।।

भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । 
बळेंवीण शक्ति बोलूं नये ।। १ ।। 
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरीत । 
उगा राहें निवांत शिणसी वायां ।। २ ।। 
सायास करिसी प्रपंची दिननिशीं । 
हरीसी न भजसी कवण्या गुणें ।। ३ ।। 
ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । 
तुटेल धरणें प्रपंचाचें ।। ४ ।।

योग याग विधी येणें नोहे सिद्धि । 
वायाचि उपाधी दंभ धर्म ।। १ ।। 
भावेंवीण देव नकळे नि:संदेह । 
गुरुवीण अनुभव कैसा कळे ।। २।। 
तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । 
गुजेंवीण हित कोण सांगे ।। ३ ।। 
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । 
साधुचे संगती तरणोपाय ।। ४ ।।

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । 
ठायींच मुराला अनुभव ।। १ ।। 
कापुराची वाती उजळली ज्योती । 
ठायींच समाप्ती झाली जैसी ।। २ ।। 
मोक्षरेखे आला भाग्यें विनटला ।
साधुचा अंकिला हरिभक्त ।। ३ ।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं ।
हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्त्वी ।। ४ ।।

पर्वताप्रमाणे पातक करणें । 
वज्रलेप होणें अभक्तांसी ।। १ ।। 
नाहीं ज्यासी भक्ति तो पतित अभक्त । 
हरिसी न भजत दैवहत ।। २ ।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । 
त्यां कैसेनि गोपाळ पावे हरी ।। ३ ।।
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । 
सर्वाघटीं पूर्ण एक नांदे ।। ४ ।।

संतांचे संगती मनोमार्ग गती ।
आकळावा श्रीपती येणें पंथें ।। १ ।।
रामकृष्ण वाचा भाव हा जिवाचा । 
आत्मा जो शिवाचा राम जप ।। २ ।।
एकतत्त्व नाम साधिती साधन । 
द्वैताचें बंधन न बाधिजे ।। ३ ।।
नामामृत गोडी वैष्णवा लाधली । 
योगियां साधली जीवनकळा ।। ४ ।।
सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्णदाता ।। ५ ।।
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । 
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणें ।। ६ ।।

विष्णुवीण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । 
रामकृष्णीं मन नाहीं ज्याचे ।। १ ।।
उपजोनि करंटा नेणे अद्वैत वाटा ।
रामकृष्णीं पैठा कैसेंनि होय ।। २ ।।
द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान । 
तया कैचें कीर्तन घडेल नामीं ।। ३ ।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । 
नामपाठ मौन प्रपंचाचें ।। ४ ।।


।। रामकृष्णहरि जय जय रामकृष्णहरि ।।
।। रामकृष्णहरि जय जय रामकृष्णहरि ।।
।। रामकृष्णहरि जय जय रामकृष्णहरि ।।


१०
त्रिवेणीसंगमी नाना तीर्थे भ्रमी । 
चित्त नाहीं नामी तरी तें व्यर्थ ।। १ ।।
नामासी विन्मुख तो नर पापिया । 
हरिवीण धांवया न पवे कोणी ।। २ ।। 
पुराणप्रसिध्द बोलिले वाल्मिक । 
नामें तिन्हीं लोक उध्दरती ।। ३ ।। 
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । 
परंपरा त्याचें कुळ शुध्द ।। ४ ।। 

११
हरि उच्चारणीं अनंत पापराशी । 
जातील लयासी क्षणमात्रं ।। १ ।। 
तृण अग्निमेळें समरस झालें । 
तैसे नामें केलें जपतां हरि ।। २ ।। 
हरि उच्चारण मंत्र हा अगाध ।
पळे भूतबाधा भेणें तेथें ।। ३ ।। 
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । 
न करवे अर्थ उपनिषदां ।। ४ ।। 

१२
तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धि । 
वायांचि उपाधि करिसी जना ।। १ ।। 
भावबळें आकळें येऱ्हवीं नाकळे । 
करतळीं आवळें तैसा हरि ।। २ ।। 
पारियाचा रवा घेतां भूमीवरी । 
यत्न परोपरी साधन तैसें ।। ३ ।। 
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । 
दिधलें संपूर्ण माझ्या हातीं ।। ४ ।। 

१३
समाधी हरीची समसुखेंवीण । 
न साधेल जाण द्वैतबुद्धी ।। १ ।। 
बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें। 
एका केशवराजें सकळ सिद्धी ।। २ ।। 
ऋद्धि सिद्धि निधी अवधीच उपाधि । 
जंव त्या परमानंदी मन नाहीं ।। ३ ।।
ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान । 
हरीचें चिंतन सर्वकाळ ।। ४ ।। 

१४
नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी । 
कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ।। १ ।। 
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । 
पापाचे कळप पळती पुढें ।। २ ।। 
हरि हरि हरि हा मंत्र शिवाचा । 
म्हणती जे वाचा तया मोक्ष ।। ३ ।।
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । 
पाविजे उत्तम निजस्थान ।। ४ ।।

१५
एक नाम हरि द्वैत नाम दुरी । 
अद्वैत कुसरी विरळा जाणे ।। १ ।। 
समबुध्दि घेता समान श्रीहरि । 
शमदमावरी हरि झाला ।। २ ।। 
सर्वांघटी राम देहादेहीं एक । 
सूर्य प्रकाशक सहस्त्ररश्मीं ।। ३ ।। 
ज्ञानदेवा चित्तीं हरीपाठ नेमा । 
मागिलिया जन्मा मुक्त झालों ।। ४ ।। 

१६
हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभ । 
वाचेसि सुलभ रामकृष्ण ।। १ ।। 
रामकृष्ण नामीं उन्मनी साधिली । 
तयासी लाधली सकळ सिद्धि ।। २ ।। 
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । 
प्रपंची निवाले साधुसंगें ।। ३ ।। 
ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा । 
येणें दशदिशा आत्माराम ।। ४ ।। 

१७
हरिपाठ कीर्ति मुखें जरी गाय । 
पवित्रचि होय देह त्याचा ।। १ ।। 
तपाचें सामर्थ्य तपिन्नला अमूप । 
चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ।। २ ।। 
मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार । 
चतुर्भुज नर होऊनि ठेले ।। ३ ।। 
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । 
निवृत्तीनें दिधलें माझ्या हातीं ।। ४ ।। 

१८
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । 
हरिवीण सौजन्य नेणे कांहीं ।। १ ।। 
तया नरा लाधलें वैकुंठ जोडलें । 
सकळही घडलें तीर्थाटन ।। २ ।। 
मनोमार्गे गेला तो येथें मुकला । 
हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ।। ३ ।। 
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । 
रामकृष्णीं आवडी सर्वकाळ ।। ४ ।। 


।। जय जय विठोबा रखुमाई ।। 
।। जय जय विठोबा रखुमाई ।। 
।। जय जय विठोबा रखुमाई ।। 


१९
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । 
पापें अनंत कोडी गेलीं त्यांचीं ।। १ ।। 
अनंत जन्माचें तप एक नाम । 
सर्व मार्ग सुगम हरिपाठ ।। २ ।। 
योग याग क्रिया धर्माधर्म माया । 
गेले ते विलया हरिपाठीं ।। ३ ।। 
ज्ञानदेवीं यज्ञ याग क्रिया धर्म । 
हरिविण नेम नाहीं दुजा ।। ४ ।। 

२०
वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचें वचन । 
एक नारायण सार जप ।। १ ।। 
जप तप कर्म हरिवीण धर्म । 
वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ।। २ ।। 
हरिपाठीं गेलें ते निवांतचि ठेले । 
भ्रमर गुंतले सुमनकळिके ।। ३ ।। 
ज्ञानदेवीं मंत्र हरिनामाचें शस्त्र । 
यमें कुळगोत्र वर्जियेलें ।। ४ ।। 

२१
काळवेळ नाम उच्चारितां नाहीं। 
दोन्ही पक्ष पाहीं उध्दरती ।। १ ।। 
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । 
जडजीवां तारण हरि एक ।। २ ।। 
हरि नाम सार जिव्हा या नामाची। 
उपमा त्या देवाची कोण वानी ।। ३ ।।
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । 
पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ।। ४ ।। 

२२
नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । 
लक्ष्मीवल्लभ तया जवळी ।। १ ।। 
नारायण हरि नारायण हरि । 
भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ।। २ ।।
हरिवीण जन्म तो नर्कचि पै जाणा । 
यमाचा पाहुणा प्राणी होय ।।३।। 
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । 
गगनाहूनि वाड नाम आहे ।। ४ ।। 

२३
सात पांच तीन दशकांचा मेळा । 
एकतत्वीं कळा दावी हरि ।। १ ।। 
तैसें नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ । 
तेथें कांहीं कष्ट न लगती ।। २ ।। 
अजपा जपणें उलट प्राणाचा । 
तेथेंही मनाचा निर्धारु असे ।। ३ ।। 
ज्ञानदेवा जिणें नामेंवीण व्यर्थ । 
रामकृष्णीं पंथ क्रमीयेला ।। ४ ।।

२४
जप तप कर्म क्रिया नेम धर्म । 
सर्वाघटीं राम भावशुध्द ।। १ ।। 
न सोडी रे भावो टाकी रे संदेहो । 
रामकृष्णीं टाहो नित्य फोडी ।। २ ।।
जात वित्त गोत कुळशीळ मात । 
भजे कां त्वरित भावनायुक्त ।। ३ ।। 
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । 
वैकुंठभुवनीं घर केले ।। ४ ।। 

२५
जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । 
हरि उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ।। १ ।। 
नारायण हरि उच्चार नामाचा । 
तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ।। २ ।। 
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । 
तें जीव जंतूसी केवीं कळे ।। ३ ।। 
ज्ञानदेवा फळ नारायणपाठ । 
सर्वत्र वैकुंठ केलें असें ।। ४ ।। 

२६
एकतत्त्व नाम दृढ धरीं मना । 
हरिसी करुणा येईल तुझी ।। १ ।। 
तें नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद । 
वाचेसी सद्गद जपें आधीं ।। २ ।। 
नामापरते तत्त्व नाहीं रे अन्यथा । 
वायां आणिका पंथा जासी झणी ।। ३ ।। 
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरीं । 
धरोनि श्रीहरि जपें सदां ।। ४ ।। 

२७
सर्वसुख गोडी साही शास्त्रें निवडी । 
रिकामा अर्धघडी राहूं नको ।। १ ।। 
लटिका व्यवहार सर्व हा संसार । 
वाया येरझार हरिवीण ।। २ ।। 
नाम मंत्र जप कोटी जाईल पाप । 
कृष्णनामीं संकल्प धरुनि राहें ।। ३ ।। 
निजवृत्ति काढीं सर्व माया तोडीं। 
इंद्रियां सवडी लपों नको ।। ४ ।।
तीर्थव्रतीं भाव धरी रे करुणा । 
शांति दया पाहुणा हरि करीं ।। ५ ।। 
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । 
समाधि संजीवन हरिपाठ ।। ६ ।। 

२८
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस ।
रचिले विश्वासें ज्ञानदेवें ।। १ ।।
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । 
होय अधिकारी सर्वथा तो ।। २ ।।
असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मन । 
उल्हासें करून स्मरण जीवी ।। ३ ।।
अंतकाळीं तैसा संकटाचें वेळीं । 
हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ।। ४ ।।
संतसज्जनानीं घेतली प्रचीती । 
आळशी मंदमती केवीं तरें ।। ५ ।।
श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ । 
तोषला तात्काळ ज्ञानदेव ।। ६ ।।


।। पुडंलिक वरदा हरि विठ्ठल ।।
।। पुडंलिक वरदा हरि विठ्ठल ।।
।। पुडंलिक वरदा हरि विठ्ठल ।।


नामसंकीर्तन साधन पैं सोपें । 
जळतील पापें जन्मांतरे ।। १ ।। 
न लगती सायास जावें वनांतरा । 
सुखें येतों घरा नारायण ।। २ ।। 
ठायीच बैसोन करा एकचित्त । 
आवडी अनंत आळवावा ।। ३ ।। 
रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । 
मंत्र हा जपावा सर्वकाळ ।। ४ ।। 
याविण आणिक असतां साधन । 
वाहातसें आण विठोबाची ।। ५ ।। 
तुका म्हणे सोपें आहे सर्वाहूनि । 
शाहाणा तो धणी घेतो येथें ।। ६ ।। 

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरीं । 
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ।। १ ।। 
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । 
पुण्याची गणना कोण करी ।। २ ।। 
असोनि संसारी जिव्हे वेगु करीं ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ।। ३ ।। 
ज्ञानदेव म्हणे व्यासाचियें खुणा । 
द्वारकेचा राणा पांडवां घरीं ।। ४ ।।


।। ज्ञानोबा माऊली तुकाराम ।।
।। ज्ञानोबा माऊली तुकाराम ।।
।। ज्ञानोबा माऊली तुकाराम ।।


गुरुपरंपरेचे अभंग| संपूर्ण हरिपाठ गुरुपरंपरेचे अभंग| गुरुपरंपरेचे अभंग हरिपाठ| गुरुपरंपरेचे अभंग लिखित| guruparampareche abhang| guruparampareche abhang lyrics


सत्यगुरुरायें कृपा मज केली । 
परि नाहीं घडली सेवा कांहीं ।। १ ।। 
सांपडविले वाटे जातां गंगास्नाना । 
मस्तकीं जाणा ठेविला कर ।। २ ।। 
भोजना मागती तूप पावशेर । 
पडिला विसर स्वप्नामाजीं ।। ३ ।। 
काय कळें उपजला अंतराय । 
म्हणोनियां काय त्वरा झाली ।। ४ ।। 
राघवचैतन्य केशवचैतन्य । 
सांगितली खूण मालिकेची ।। ५ ।।
बाबाजीं आपुलें सांगितलें नाम । 
मंत्र दिला रामकृष्णहरि ।। ६ ।। 
माहो शुद्ध दशमी पाहूनि गुरुवार ।
केला अंगीकार तुका म्हणे ।। ७ ।। 

माझियें मनींचा जाणोनिया भाव ।
तो करी उपावो गुरुरावो ।। १ ।।
आवडीचा मंत्र सांगितला सोपा । 
जेणें नोहे गुंफा कांहीं कोठें ।। २ ।। 
जाती पुढे एक उतरले पार । 
हा भवसागर साधुसंत ।। ३ ।।
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । 
उतार सांगडी तापे पेटे ।। ४ ।। 
तुका म्हणे मज दावियेला तारु । 
कृपेचा सागरु पांडुरंग ।। ५ ।। 

घालूनियां भार राहिलों निश्चिंती । 
निरविलें संती विठोबासी ।। १ ।। 
लावूनिया हात कुरवाळिला माथा । 
सांगितली चिंता न करावी ।। २ ।। 
कटीं कर सम चरण साजिरे । 
राहिला भीवरेतीरीं उभा ।। ३ ।। 
खुंटले सायास आणीक या जीवा । 
धरिले केशवा पाय तुझें ।। ४ ।। 
तुज वाटे आतां तें करीं अनंता । 
तुका म्हणे संतां लाज माझी ।। ५ ।। 

माझ्या विठाबाचा कैसा प्रेमभाव । 
आपणचि देव होय गुरु ।। १ ।। 
पढियें देहभाव पुरवी वासना । 
अंती तें आपणापाशीं न्यावें ।। २ ।। 
मागे पुढें उभा राहे सांभाळीत । 
आलिया आघात निवारावे ।। ३ ।।
योगक्षेम त्याचें जाणें जडभारी । 
वाट दावी करीं धरुनियां ।। ४ ।। 
तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । 
पाहावे पुराणीं विचारूनी ।। ५ ।। 

आदिनाथ उमा बीज प्रकटिलें । 
मच्छिंद्रा लाधलें सहजस्थिती ।। १ ।। 
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । 
पूर्ण कृपा केली गहिनीनाथा ।। २ ।।
वैराग्यें तापला सप्रेमें निवाला ।
ठेवा जो लाधला शांतिसुख ।। ३ ।। 
निद्वंद्व निःशंक विचरतां मही । 
सुखानंद हृदयीं स्थिरावला ।। ४ ।। 
विरक्तीचें पात्र अन्वयाचें मुख । 
येऊनि सम्यक अनन्यता ।। ५ ।। 
निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण । 
कुळ हें पावन कृष्णनामें ।। ६ ।। 

आदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा । 
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। १ ।। 
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला । 
गोरक्ष बोळला गहिनीप्रती ।। २ ।। 
गहिनी प्रसादें निवृत्ति दातार । 
ज्ञानदेवा सार चोजविलें ।। ३ ।। 

अवघाचि संसार सुखाचा करीन । 
आनंदे भरीन तिन्हीं लोक ।। १ ।। 
जाईन गे माये तया पंढरपूरा । 
भेटेन माहेरा आपुलिया ।। २ ।। 
सर्व सुकृतांचें फळ मी लाहीन । 
क्षेम मी देईन पांडुरंगा ।। ३ ।। 
बापरखुमादेविवरू विठ्ठलाची भेटी । 
आपुले संवसाटीं करुनि ठेला ।। ४ ।।

अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता । 
चरणी जगन्नाथा चित्त ठेले ।। १ ।।
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । 
अनाथाचा नाथ जनार्दन ।। २ ।।
एका जनार्दनी एकपणे उभा । 
चैतन्याची शोभा शोभतसे ।। ३ ।।

श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा ।
इतरांचा लेखा कोण करी ।। १ ।।
राजयाची कांता काय भीक मागे ।
मनाचिया जोगे सिध्दि पावे ।। २ ।।
कल्पतरुतळवटीं जो कोणी बैसला ।
काय वाणी त्याला सांगिजो जी ।। ३ ।।
ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों ।
आतां उध्दरलों गुरुकृपें ।। ४ ।।

इवलेंसें रोप लावियेलें द्वारीं ।
त्याचा वेलु गेला गगनावरी ।। १ ।। 
मोगरा फुलला मोगरा फुलला । 
फुलें वेंचितां अतिभारु कळियांसी आला ।। २ ।। 
मनाचिये गुंतीं गुंफियेला शेला । 
बापरखुमादेविवरु विठ्ठलीं अर्पिला ।। ३ ।।


।। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ।।
।। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ।।
।। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ।।


संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ
ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ
ज्ञानेश्वर महाराजांचा संपूर्ण हरिपाठ
ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ
संपूर्ण हरिपाठ
sant dnyaneshwar maharaj haripath
Sampurna haripath
Haripath
गुरुपरंपरेचे अभंग
संपूर्ण हरिपाठ गुरुपरंपरेचे अभंग
गुरुपरंपरेचे अभंग हरिपाठ
गुरुपरंपरेचे अभंग लिखित 
guruparampareche abhang guruparampareche abhang lyrics



एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ